अकाेला : ज्येष्ठ नागरिकांची दुसरा डाेस घेण्यासाठी सुरू असलेली धावपळ त्यातच तरुणांची उसळलेली गर्दी व काेविशिल्ड, काेव्हॅक्सिन लसीच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या संभ्रमावरून बुधवारी शहरातील कस्तुरबा गांधी रुग्णालय व किसनीबाई भरतिया रुग्णालयातील लसीकरण केंद्रांत नागरिकांनी चांगलाच गाेंधळ घातला. या दाेन्ही रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धाकदपट हाेत असल्याने पाेलिसांना पाचारण करावे लागले. या वेळी पाेलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
जीवघेण्या काेराेनाला आळा घालण्यासाठी मार्च महिन्यापासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. ज्या नागरिकांना लसीचा पहिला डाेस देण्यात आला, त्यांच्या दुसरा डाेस घेण्याची मुदत संपुष्टात आली आहे. यादरम्यान, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्य शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ केला असून, यामुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणांची तारांबळ उडत आहे. यात भरीस भर लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना माघारी परत जावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये यंत्रणांप्रति राेष निर्माण हाेत आहे. मंगळवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अचानक अकाेटफैलस्थित मनपाच्या रुग्णालयात जाण्याची सूचना करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, बुधवारी कस्तुरबा गांधी, किसनीबाई भरतिया, हरिहरपेठ येथील लसीकरण केंद्रांत पहाटे ४ वाजतापासून गर्दी करणाऱ्या नागरिकांनी चांगलाच गाेंधळ घातला.
भर उन्हात नागरिकांच्या रांगा
बुधवारी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत लस देण्याचा अवधी हाेता. मागील काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असला तरीही लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. पहाटेपासून रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना लसीच्या उपलब्धतेनुसार कुपनवाटप केले जात आहे. गर्दीमुळे कुपन प्राप्त हाेत नसल्याने या ठिकाणी नागरिकांनी मनपा कर्मचाऱ्यांवर ताेंडसुख घेतले.
आजपासून सकाळी ८ वाजता लसीकरण
ज्येष्ठ नागरिकांना जीवाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात तासन् तास उभे राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता उद्या गुरुवारपासून सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंतच्या कालावधीत लसीकरण माेहीम राबविली जाणार आहे.
तरुणांनाे, गर्दी करू नका!
गुरुवारपासून ज्येष्ठ नागरिकांना दुसऱ्या डाेससाठी प्राधान्य दिले जाणार आहे. लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस दिली जाणार आहे. उदा. लसीचे २०० डाेस असतील तर ज्येष्ठ नागरिकांसाठी १४० व पहिला डाेस घेणाऱ्यांसाठी ६० डाेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यादरम्यान तरुणांचे लसीकरण बंद असल्याने त्यांनी गर्दी टाळण्याची गरज आहे.