काेराेनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाच्या माेहिमेला सुरूवात हाेताच नागरिकांमधील बेफिकिरी वाढीस लागली आहे. बाजारात ताेंडाला मास्क न लावत नागरिक बिनधास्त संचार करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. लसीकरणाला सुरूवात झाली असली तरी काेराेना विराेधातील लढाइ अद्याप संपली नसल्याचे राज्य शासनाकडून वारंवार स्पष्ट केले जात आहे. तरीही नागरिक जाणीवपूर्वक गाफिल राहत असल्याने मागील काही दिवसांत शहरात काेराेनाचे संक्रमण वाढल्याचे समाेर आले आहे. मनपाच्या लेखी शहरातील पूर्व व दक्षिण झाेन हाॅटस्पाॅट ठरले असतानाच आता त्यामध्ये पश्चिम झाेनचा समावेश हाेण्याची दाट शक्यता आहे. जुने शहरातील साेनटक्के प्लाॅट, डाबकी राेड, खैरमाेहम्मद प्लाॅट, गुलजारपूरा, शांती नगर आदी भागात काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती आहे.
नियम पायदळी;नागरिकांचा मुक्तसंचार
काेराेनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नसल्याची परिस्थती आहे. साेशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवित जुने शहरात नागरिकांचा मुक्त संचार दिसून येत आहे. बेजबाबदार नागरिकांविराेधात मनपा प्रशासनाने कारवाइचा दंडुका उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.
मे महिन्यात स्थिती बिकट
शहरात काेराेनाचा पहिला रुग्ण ७ एप्रिल राेजी बैदपुरा भागात आढळून आल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत मे महिन्यांत जुने शहरातील खैरमाेहम्मद प्लाॅट परिसर हाॅटस्पाॅट ठरला हाेता. त्यावेळी नागरिकांमध्ये कमालीची धास्ती हाेती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.