अकोला: उन्हाळा सुरू होताच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात नागरिक मोठय़ा प्रमाणावर शीतपेयांची (कोल्ड्रिंक्स) खरेदी करतात. त्यामुळे ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर मुदतबाह्य शीतपेये विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरासोबतच परिसरातील गावांमध्ये सुरू असल्याचे रविवारी 'लोकमत'ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आले आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच, शहरात व ग्रामीण भागात शीतपेयांची मागणी प्रचंड वाढली आहे. उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये किराणा दुकान, पानटपरीपासून ते हॉटेल, रेस्टॉरंटपर्यंत शीतपेयांची विक्री होते. उन्हाच्या वाढत्या प्रकोपापासून बचाव करण्यासाठी नागरिक शीतपेये, लिंबू सरबत, उसाचा रस, विविध प्रकारचे ज्यूस, नारळ पाणी यांचा आधार घेतात. हे हेरून ग्रामीण व शहरी भागात शीतपेयांची नवीन दुकाने थाटली जात आहेत. तथापि, नागरिकांकडून मागणी वाढली असल्यामुळे अनेक दुकानदारांनी मुदतबाह्य शीतपेयांची सर्रास विक्री चालविली आहे. यामध्ये अनेक देशी-विदेशी कंपन्यांची शीतपेये बाजारात उपलब्ध आहेत. अकोला शहरासह जठारपेठ, रतनलाल प्लॉट, राऊतवाडी आणि शिवणी, मलकापूर परिसरात लोकमत चमूने शीतपेयाच्या बाटल्या खरेदी केल्या आणि त्यावरील माहिती तपासून पाहिली असता, काही नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांवर ऑगस्ट, एप्रिल २0१५ ही पॅकिंग केल्याची तारीख दिसून आली, तर काही शीतपेयाच्या बाटल्यांवरील वैधता दिनांक काळ्या शाईने मिटवून ग्राहकांना विक्री केली जात असल्याचे दिसून आले. काही बाटल्यांवर तर छापील तारीखेमध्ये खाडाखोड केल्याचे दिसून आले. यासंदर्भात एका विक्रेत्याला विचारणा केली असता, आम्हाला व्यापार्यांकडून ज्या मालाचा पुरवठा झाला, तोच आम्ही विकतो, असे त्याने सांगितले. यादरम्यान अनेक ग्राहक शीतपेयांच्या बाटल्यांवरील छापील माहिती जाणून न घेता थेट मुदतबाहय़ शीतपेय पीत असल्याचे दिसून आले.
नागरिकांनो सावधान : मुदतबाह्य शीतपेयांची बाजारात धूम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2016 1:27 AM