बाेरगाव मंजू : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २३ फेब्रुवारी रोजी बोरगाव मंजू येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला. सकाळी काही व्यापारी, दुकानदार, भाजीपाला व्यावसायिक आठवडी बाजारात दाखल झाले होते. दरम्यान, पोलिसांनी धाव घेत संबंधितांना समज देण्यात आली. त्यामुळे बाजारात शुकशुकाट दिसून आला. मंगळवारी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात काेराेना चाचणी घेण्यात आली. एकूण २०५ नागरिकांनी स्वॅबचे नमुने दिले. प्रशासनाने नागरिकांना काेराेना चाचणी करण्याचे आवाहन केले हाेते. त्याला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. महसूल उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, प्रभारी गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे, प्रभारी ठाणेदार सुरेंद्र राऊत, ग्रामविकास अधिकारी विनोद वसू, आरोग्य अधिकारी डॉ. बनसोडे, आशा गटप्रवर्तक वर्षा ढोके यांच्यासह अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले. आठवडी बाजार बंदचे निर्देश असतानासुद्धा आज सकाळी येथील आठवडी बाजारात व्यावसायिक दुकाने थाटण्याच्या तयारीत हाेते. या बाबीची दखल घेत सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगळे, तुषार मोरे, कर्मचारी संदीप देशमुख, रामहरी नागे, संतोष माळोकार सोनटक्के यांनी बाजार बंद पाडला. पुढील आदेशापर्यंत बाजार बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.
बोरगावात काेराेना चाचणीला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:20 AM