अकोला : कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव शहरी व ग्रामीण भागांत सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाढत असून, योग्य उपचार न मिळल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मधुमेह व उच्च रक्तदाब आजारी असलेल्या कोविड रुग्णानी १० ते १२ दिवस घरी उपचार घेतल्यानंतर, नामांकित खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर बुधवारी त्यांचा मृत्यू झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी नागरिकांनी कोविडची लक्षणे दिसताच स्वत:हून कोविड चाचणी करून घ्यावी व कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर घरी उपचार न घेता रुग्णालयात दाखल होऊन योग्य उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाबाबत वॉररूममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक राजकुमार चव्हाण, महापालिकेचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, डॉ. अश्विनी खडसे, डॉ. अनुप चौधरी, जिल्हा परिषदचे प्रसारमाध्यम अधिकारी प्रकाश गवळी, आदी उपस्थित होते.
चाचण्या वाढवा
महानगरपालिका क्षेत्रात कोविड चाचण्या वाढविण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे सक्तीने पालन करून अनावश्यक कारणासाठी घराबाहेर जाऊ नये, प्रत्येक कोरोना रुग्णाने आधार कार्ड किंवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. होम आयसोलेशन सद्य:स्थिती, आयसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला. होम आयसोलेशन नियमांचे पालन न करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.