अकाेला : मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी उत्पन्नाअभावी दिवाळे निघालेली शहर बस वाहतूक सेवा नव्याने प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत. सेवा सुरू राहावी व संबंधित एजन्सीला उत्पन्न प्राप्त व्हावे, या उद्देशातून महापालिकेच्या हद्दीपासून २० किमी अंतरावरील गावांपर्यंत बसेस धावणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. शहरवासीयांना मुबलक दरात प्रवास करता यावा, या उद्देशातून मनपा प्रशासनाने २००४ मध्ये सिटी बससेवा सुरू केली हाेती. २०१३ मध्ये बससेवेला घरघर लागली. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी २०१६ मध्ये नव्याने बससेवेला प्रारंभ केला. श्रीकृपा ट्रॅव्हल्सने २० बसेस सुरू केल्या हाेत्या; परंतु शहरात अनधिकृत ऑटाेचालकांचा निर्माण झालेला सुळसुळाट पाहता २०१९ मध्ये उत्पन्नाअभावी एजन्सीचे दिवाळे निघाले. आता पुन्हा दाेन वर्षांच्या कालावधीनंतर ही सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधित एजन्सीला सेवा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर सात बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, उत्पन्नासंदर्भात एजन्सीची अडचण लक्षात घेता मनपाच्या हद्दीपासून २० किमीपर्यंत बस धावण्याला प्रशासनाकडून मंजुरी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत.
एसटी महामंडळाकडे द्यावा लागेल प्रस्ताव
मनपाची हद्दवाढ संपल्यानंतर २० किमीपर्यंतचा पल्ला बसेस गाठू शकतील. या २० किमीच्या अंतरामध्ये बाळापूर, बार्शिटाकळी, चाेहाेट्टा, बाेरगाव मंजू आदी शहरांचा समावेश हाेऊ शकताे. अर्थात, यासाठी राज्य परिवहन महामंडळाची परवानगी घेणे क्रमप्राप्त असणार आहे. मनपाला तसा प्रस्ताव सादर करावा लागेल.