अकोला, दि. १७- स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिका स्तरावर वैयक्तिक शौचालय उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी अकोलेकरांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी उघड्यावर शौच न करता शौचालयांचा वापर करण्याचे आवाहन मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाच्या ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियानांतर्गत शहरी भागाला हगणदरीमुक्त करण्याचे महापालिकांना उद्दिष्ट आहे. घरी वैयक्तिक शौचालय नसणार्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे काम मनपा स्तरावर सुरू आहे. मनपाच्या स्वच्छता विभागाने शहरात सर्व्हे करून आजपर्यंत ११ हजार ५१५ वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण केल्याची माहिती आयुक्त अजय लहाने यांनी दिली. उर्वरित २00 शौचालयांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मनपाची हद्दवाढ झाल्यामुळे नवीन प्रभागातदेखील दोन हजार वैयक्तिक शौचालय बांधण्याचे काम सुरू आहे. वैयक्तिक शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करून शहर हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. त्यासाठी महापालिकांना ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ३१ मार्चनंतर १ मेपर्यंत शहराला हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे निर्देश असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. त्यानंतर मात्र शासनाकडून विशेष योजनांचे अनुदान बंद केले जाईल. त्यामुळे अकोलेकरांनी आता शौचालयांचा वापर करण्याची नितांत गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळी उपायुक्त समाधान सोळंके उपस्थित होते. सार्वजनिक शौचालयांमध्ये सुविधाशहरात ९६ ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. त्या ठिकाणी १ हजार ७२८ सिटची व्यवस्था करण्यात आली असून, नवीन सात ठिकाणी शौचालयांचे बांधकाम केले जात आहे. ज्या ठिकाणी पाणी, वीज, स्वच्छता अशा सुविधा नव्हत्या, त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याची माहिती आयुक्त लहाने यांनी दिली.
शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी हवे सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 2:43 AM