शहरात सणासुदीच्या दिवसांमुळे गर्दीने बाजारपेठेत फुलला आहे. गणेशाेत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून, उद्या हरितालिका आहे. शुक्रवारी गणपती बाप्पांचे तसेच
रविवारी ज्येष्ठागाैरींचे आगमन हाेणार आहे. एकूणच, अकाेलेकर पावित्र्य व मांगल्याची अनुभूती देणाऱ्या सणासुदीच्या तयारीत व्यस्त असताना दुसरीकडे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर घाण व अस्वच्छता पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुर्गंधीमुळे बाजारात ग्राहकांना नाकाला रुमाल बांधून विविध साहित्याची खरेदी करावी लागत आहे. पावसाची रिपरिप सुरुच असल्याने साथीचे आजार बळावले असून अकाेलेकर तापाने फणफणत असल्याची परिस्थिती आहे. अस्वच्छतेची समस्या निकाली काढण्यासाठी मनपा प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरत असल्याची बाब शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी आयुक्त निमा अराेरा यांच्या निदर्शनास आणून दिली. सणासुदीचे दिवस पाहता यावर तातडीने उपाय करण्याची मागणी सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चाेपडे, नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले यांनी आयुक्त अराेरा यांच्याकडे लावून धरली.
साफसफाइवर प्रभावी ताेडगा काढू!
मनपाने कचरा उचलण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले ट्रॅक्टर अपुरे आहेत. अनेक सफाइ कर्मचाऱ्यांनी कर्तव्याकडे पाठ फिरवल्याची बाब मिश्रा यांनी नमूद केली. त्यावर एक-दाेन दिवसांतच साफसफाइच्या संदर्भात प्रभावी ताेडगा काढणार असल्याचे निमा अराेरा यांनी स्पष्ट केले.
‘त्या’वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अहवाल तपासणार
हरिहरपेठ येथील लसीकरण केंद्रात लस देताना चूक करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह परिचारिका व आशा सेविकेच्या निलंबनाचा मुद्दा राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. यासंदर्भात आयुक्तांनी वैद्यकीय आराेग्य अधिकारी डाॅ. अस्मिता पाठक यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.