जठारपेठ मार्गावर साचले पाणी
अकाेला: जलवाहिनी फुटल्याने रतनलाल प्लाॅट ते जठारपेठ मार्गावरील ओझाेन हाॅस्पिटलजवळ मुख्य सिमेंट रस्त्यावर पाणी साचल्याचे शनिवारी दिसून आले. रात्री रस्त्यात सर्वत्र पाणी साचल्याने दुचाकी वाहनचालकांना जीव धाेक्यात घालून मार्गक्रमण करावे लागले. याठिकाणी अनेकदा जलवाहिनीला गळती लागून पाण्याची नासाडी हाेत असल्याचे पाहावयास मिळते. याकडे मनपाचे दुर्लक्ष हाेत आहे.
वारकऱ्यांना अटक;भाजपचा निषेध
अकाेला: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या तात्यासाहेब बंड व जिल्ह्यातील विश्व वारकरी सेनेचे गणेश शेट्टी महाराज यांना पोलिसांनी अटक केल्याचा प्रकार घडला आहे. वारकरी काेणतीही गर्दी न करता शांततेत पायी जात असताना पाेलिसांनी अटकेची कारवाई केली. राज्य शासनाच्या या भूमिकेचा भाजप अध्यात्म आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
उकाड्यामुळे अकाेलेकर त्रस्त
अकाेला: मागील पाच ते सहा दिवसांपासून शहरात उकाडा जाणवत आहे. त्यापूर्वी पाऊस आल्याने वातावरणात बदल झाला हाेता. या बदलामुळे लहान मुले व वयाेवृद्ध नागरिकांमध्ये तापाचे प्रमाण वाढले असून शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याने किरकाेळ आजारी पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीती व धास्तीचे वातावरण आहे.
मुख्य रस्त्यांवर साचली माती
अकाेला: शहरातील प्रमुख रस्त्यांची मनपातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त असताना कर्मचाऱ्यांकडून थातूर मातूर साफसफाई केली जात आहे. रस्त्यांची झाडपूस केल्यानंतर जमा झालेली माती ट्रॅक्टरमध्ये जमा न करता दुभाजकांलगत मातीचे ढीग लावले जात आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय ते अशाेक वाटीका, जिल्हा परिषद कार्यालय ते बाळासाहेब ठाकरे उद्यान ते निमवाडी चाैक रस्त्याचा समावेश आहे.
जुना भाजी बाजारात अस्वच्छता
अकाेला: जैन मंदिर परिसरातील जुना भाजी बाजारात व्यावसायिकांकडून सडका भाजीपाला उघड्यावर फेकला जात आहे.
सदर व्यावसायिकांना वारंवार अल्टीमेटम दिला जात असल्याचा दावा मनपाच्या बाजार व परवाना विभागाकडून केला जाताे. तरीही व्यावसायिक जुमानत नसल्याने सडक्या भाजीपाल्यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे.