अतुल जयस्वाल / अकोलाबुद्धिबळाच्या सारिपाटावर भल्याभल्यांना मात देऊन शालेय स्तरावरील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविलेली, अकोल्याची ह्यचौसष्ठ घरांची राणीह्ण म्हणून ओळखली जात असलेली संस्कृती वानखडे हिला जागतिक क्रमवारीत दुसरी तसेच भारतातील अव्वल मानांकित महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिच्यासह इतर दिग्गज बुद्धिबळपटूंचा खेळ जवळून अनुभवण्याची संधी मिळाली आहे. पुणे येथे १0 ते १५ जून दरम्यान पार पडलेल्या महाराष्ट्र चेस लीग स्पर्धेत सहभागी बुद्धिबळपटूंच्या खेळी लिहिण्याचे भाग्य संस्कृतीला लाभले.संस्कृती संघदास वानखडे ही अकोल्याची दहा वर्षीय बुद्धिबळपटू. तिला भविष्यात कोनेरू हम्पी, ज्यूडिथ पोल्गर, सुझान पोल्गर, हू थिफान यांच्यासारखे ग्रँडमास्टर व्हायचे आहे. तिने आतापर्यंत शालेय स्तरावरील विविध स्पर्धा गाजविल्या आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या संयुक्त विद्यमान चौथी एमसीएल स्पर्धा पुण्यातील हिंदू जिमखाना येथे १0 ते १५ जून दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेत अव्वल बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. राज्यातील उदयोन्मुख बुद्धिबळपटूंना अव्वल मानांकित बुद्धिबळपटूंच्या खेळाचे, त्यांच्या चालींचे जवळून अवलोकन करता यावे, या हेतूने या स्पर्धेतील स्पर्धकांच्या खेळी लिहिण्यासाठी विशेष अशा बुद्धिबळपटूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये अकोल्याच्या संस्कृतीचीही निवड झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संस्कृतीला अव्वल मानांकित महिला ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीची खेळी लिहिण्याची संधी मिळाली तसेच भारताचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचाही खेळ लिहिण्याची संधी मिळाली. या स्पर्धेच्या निमित्ताने संस्कृतीला नामांकित बुद्धिबळपटूंचा खेळ, चाली, संयम, एकाग्रता, खिलाडू वृत्ती जवळून पाहावयास मिळाली. दरम्यान, संस्कृती सध्या पुणे येथे बुद्धिबळाचा सराव करीत आहे. शालेय स्तरावरील आगामी स्पर्धांचे विजेतपद पटकावण्याचा मानस तिने लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
‘संस्कृती’च्या भाळी, कोनेरू हम्पीची खेळी!
By admin | Published: June 17, 2016 2:33 AM