अकोला -रेल्वे स्टेशनसमोरील प्रसिद्ध असलेल्या आनंद रेस्टॉरंटचे संचालक आनंद अग्रवाल यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात आनंद अग्रवाल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत, तर आनंद अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या हल्ल्यात पुरोहित यांच्यासह काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.आनंद अग्रवाल यांच्या रामदास पेठेतील दत्त मंदिराजवळ असलेल्या सुमारे पाच हजार चौरस फूट प्लॉटचा गत अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. याच प्लॉटच्या वादातून प्रॉपर्टी ब्रोकर ऋषी पुरोहित व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी सोमवारी सायंकाळी आनंद अग्रवाल हे रेल्वे स्टेशनसमोरील रेस्टॉरंटमध्ये असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये अग्रवाल गंभीर जखमी झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. रामदास पेठचे ठाणेदार शैलेष सपकाळ यांनी पोलिसांसह घटनास्थळावर धाव घेऊन अग्रवाल यांना तातडीने उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करण्यात आला असून, अग्रवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे, तसेच आनंद अग्रवाल व आशिष अग्रवाल यांच्यासह काही आरोपींनी ऋषी पुरोहित व त्यांच्या मित्रावर हल्ला केला असून, यामध्ये पुरोहित व काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्रवाल याने प्लॉटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्यानंतर टाळाटाळ केल्याने ही हाणामारी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आनंद रेस्टॉरंट येथे दोन्ही गटात हाणामारी झाली. दोन्ही गटातील काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटाने परस्परविरुद्ध तक्रार दिली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामदास पेठेतील प्लॉटचा इसार करून दिल्यानंतर खरेदी न करून दिल्यामुळे ही हाणामारी झाल्याची माहिती आहे.शैलेष सपकाळठाणेदार, रामदास पेठ पोलीस स्टेशन.