अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेतील एका सामन्यात शनिवारी खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. यामध्ये पंचांसह चार ते पाच खेळाडू जखमी झाले आहेत. विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रांगणात हा धक्कादायक प्रकार घडला. दोन संघांना स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा शनिवारी सुरू झाल्या. त्या तीन दिवस चालणार आहेत. यापैकी विभागीय क्रीडा संकुलातील मैदानावर हॉकीचा सामना बार्शीटाकळी (जि. अकोला) येथील गुलाम नबी आझाद महाविद्यालय व अमरावतीचे विद्याभारती महाविद्यालय यांच्यात झाला. गुलाम नबी महाविद्यालयाच्या संघाची सामन्यावर पकड होती. यादरम्यान पंचाच्या एका निर्णयावर आक्षेप घेत दोन्ही संघांतील खेळाडूंनी वाद घातला. तो विकोपाला गेल्यानंतर खेळाडंूमध्ये अचानक हाणामारी सुरू झाली. पंच शाहबाज मध्यस्थीसाठी गेले असता, त्यांनाही खेळाडूंनी मारहाण केली. खेळाडूंनी हॉकी स्टिकने एकमेकांवर हल्ला चढविल्याने प्रचंड गोंधळ उडाला. यामध्ये चार ते पाच खेळाडू जखमी झाले. काही खेळाडूंच्या तोंडावर, हात-पायासह पाठीवर हॉकी स्टिक लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. उपस्थित अन्य पंच व आयोजकांनी दोन्ही गटांना शांत करून परत जाण्यास सांगितले. स्पर्धेदरम्यान हाणामारी करणाऱ्या दोन्ही संघांना स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. रेल्वेस्थानकापर्यंत घेतला शोध!बार्शीटाकळीचा संघ निघून गेल्यानंतर विद्याभारतीच्या संघातील खेळाडू व त्यांच्या सहकाºयांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंचा शोध घेतला. ते अकोल्याला रेल्वे मार्गे निघाल्याचे कळताच शेकडो विद्यार्थी रेल्वेस्थानकावरही धडकले.
हॉकी सामन्यात पंचाच्या निर्णयावरून वाद उफाळून आला. विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीचा परिचय न दिल्याने विद्यापीठाने दोन्ही संघांना स्पर्धेतून बाद केले आहे. क्रीडा जगतासाठी ही दुर्दैवी घटना आहे.अ.मु. असनारे, संचालक, शारीरिक व रंजन मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.