अकोला : अस्वच्छतेमुळे अकोलेकरांना विविध आजारांनी ग्रासले असून, अद्यापही महापालिका प्रशासनासह आरोग्य विभागाचे डोळे बंदच असल्याचे चित्र आहे. प्रभागात दैनंदिन साफसफाईची जबाबदारी असणारे स्वच्छता निरीक्षक ढिम्म असल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा बिनकामाच्या स्वच्छता निरीक्षकांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासन चोखपणे बजावत असल्याने शहरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरातील साफसफाईचा प्रश्न बिकट झाला असून अस्वच्छ तेअभावी नागरिकांना साथ रोगांनी बेजार करून सोडले आहे. संपूर्ण ३६ प्रभागांमध्ये घाणीचे ढीग साचले आहेत. अशा स्थितीत त्यावर उपाययोजना करण्यापेक्षा प्रशासन स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचार्यांची पाठराखण करीत आहे. प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाईन घाण व कचर्याने तुडुंब भरल्या आहेत. रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करणे अत्यावश्यक असताना काही मुख्य रस्ते वगळता इतर रस्त्यांच्या साफसफाईला फाटा देण्यात येत आहे. प्रभागांमध्ये ठिकठिकाणी गाजर गवत, झाडे-झुडपे वाढल्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी २८ स्वच्छता निरीक्षकांवर निश्चित करण्यात आली असताना, स्वच्छता निरीक्षकांना कर्तव्याचा विसर पडल्याची स्थिती आहे.
स्वच्छता निरीक्षक ढिम्म; शहरात अस्वच्छतेचा कळस
By admin | Published: September 21, 2014 1:47 AM