अकोला: केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये महापालिका क्षेत्रात स्वच्छता राखण्याच्या मानांकनात अमरावती विभागातून एकमेव अकोला महापालिकेला एक स्टार मानांकन मिळाले आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये महापालिकेला हगणदरीमुक्त शहराचा दर्जा प्राप्त झाला होता. यानंतर वेळोवेळी राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१८, २०१९ व आता २०२० मधील अभियानांतर्गत शहरांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये कचरामुक्त शहरांकरिता स्टार गुणांकन निश्चित करण्यात आले होते. या अभियानात राज्यातील नगरपालिका व महापालिका सहभागी झाली होती. त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून भारतीय गुणवत्ता परिषदेचे (क्यूसीआय)पथक शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. स्वच्छतेबाबत नागरिकांशी संवाद साधून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. तपासणीअंती महापालिकेला कचरामुक्त शहर (जी.एफ.सी.) याबाबत एक ‘स्टार’ मानांकन देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निकालानुसार सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ७० शहरांमधून ४१ शहरांना १ स्टार मानांकन देण्यात आले असून, यामध्ये अमरावती विभागातून सहभागी झालेल्या महापालिकेतून एकमेव अकोला महापालिकेचा समावेश आहे.नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून मानांकनशहरातील दैनंदिन स्वच्छतेच्या कारभारासंदर्भात क्यूसीआयच्या चमूने नागरिकांसोबत प्रत्यक्षात संवाद साधण्याची माहिती मनपाच्यावतीने देण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून स्वच्छ सर्वेक्षणाचे मानांकन ठरल्याची माहिती आहे.