अकोला : शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाण तसेच प्रभागातील अंतर्गत साफसफाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी नुकत्याच आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये प्रभाग क्र.१५ मध्ये १६ कर्मचार्यांना नियुक्तीचे आदेश दिले असले तरी अद्यापपर्यंत एकही कर्मचारी रुजू झाला नसल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे जनता भाजी बाजार, जुना कापड बाजार, नवीन कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार, जुना भाजी बाजार परिसरात अक्षरश: घाण व कचर्याचे ढीग साचले आहेत.अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ वसली आहे. प्रभाग क्र. १५ अंतर्गत जुने व नवीन बसस्थानक, जनता भाजी बाजार, जुना भाजी बाजार, जुना व नवीन कापड बाजार, किराणा बाजार, कोठडी बाजार, गांधी रोड, टिळक रोड आदी अत्यंत वर्दळीच्या ठिकाणांचा समावेश आहे. परिणामी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कचरा साचतो. मनपाच्या आस्थापनेवरील ७४0 सफाई कर्मचार्यांना प्रशासकीय प्रभागात नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, तर उर्वरित २३ पडीत वार्डांमध्ये खासगी कर्मचारी कार्यरत आहेत. सफाई कर्मचार्यांची उपलब्ध संख्या लक्षात घेता, शहर स्वच्छ असणे क्रमप्राप्त आहे; परंतु धुळीने माखलेले रस्ते, दुभाजकांमध्ये साचलेले मातीचे ढीग व ठिकठिकाणी साचलेला कचरा, असे चित्र पाहावयास मिळते. या बाबीचा अभ्यास केल्यानंतर आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी नुकत्याच आस्थापनेवरील सफाई कर्मचार्यांच्या प्रभागांतर्गत बदल्या केल्या. यामध्ये प्रभाग क्र.१५ मधील ५२ कर्मचार्यांना इतरत्र ठिकाणी हलवत त्याबदल्यात १६ कर्मचार्यांची नियुक्ती केली; परंतु आजपर्यंतही सदर कर्मचारी नियुक्त झाले नसल्याचे समोर आले असून, प्रभागातील मुख्य बाजारपेठेत कचरा व घाणीचे ढीग साचले आहेत.
आयुक्तांच्या आदेशाला सफाई कर्मचार्यांचा ठेंगा
By admin | Published: July 01, 2014 2:02 AM