अकोला : प्रवाशांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अभिनव शक्कल लढविली आहे. बहुचर्चित शोले आणि दिवार या चित्रपटांच्या डायलॉगचा वापर करीत रेल्वे प्रशासनाने अकोला रेल्वेस्थानकावर स्वच्छता मोहिमेची जनजागृती सुरू केली आहे. चित्रपटातील प्रसिद्ध हीरो आणि त्यांच्या डॉयलॉगचा वापर करून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा अफलातून प्रयोग रेल्वे विभागाने केला आहे.अकोला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवरील आरपीएफ पोलीस स्टेशनच्या ओळीत पुढे शोले आणि दिवार या जुन्या चित्रपटांचे पोस्टर लागले आहेत. या पोस्टर्सवर अमजद खान दाखविला असून, त्यावर असे संवाद आहे.... अरे ओ सांभा.... कितना जुर्माना रखा है रेल सरकारने गंदगी फैलानेपर... त्यावर खाली उत्तरही दिले गेले आहे, पुरे ५०० रुपये... याचप्रमाणे दिवार चित्रपटातील अमिताभ-ऋषिकपूरची जोडी दुसºया पोस्टरवर आहे. त्यावर मेरे पास रेलगाडी है.. रिझर्व्ह सीट है.. तुम्हारे पास क्या है.... उत्तर खबरदार दिवारपर मत थुंकना ५०० रुपये जुर्माना लगेगा. हे मार्मिक संवाद प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. मध्य रेल्वे भुसावळ मंडळाच्या आदेशान्वये लावलेल्या या जनजागृतीपर संदेशामुळे अनेकांचे मनोरंजनही होते.