अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त असलेल्या १४ सदस्यपदांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोमवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
गतवर्षी जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर एक वर्षाचा कालावधी उलटत असताना, जिल्हा नियोजन समितीवर जिल्हा परिषद सदस्यांमधून १४ सदस्यांची निवड करण्याची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असलेल्या १४ सदस्यपदांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाच्या सदस्यांकडून जिल्हा प्रशासनासह शासनाच्या संबंधित विभागाकडे लावून धरण्यात आली होती. निवडणूक कार्यक्रम तातडीने जाहीर न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारादेखील गत महिन्यात देण्यात आला होता. त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात शासनाच्या नियोजन विभागाकडून ७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याकरिता निवडणूक घेण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ११ जोनवारी रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘डीपीसी’वर जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
१४ सदस्यांची अशी होणार प्रवर्गनिहाय निवड!
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असलेल्या १४ सदस्यपदांसाठी जिल्हा परिषद सदस्यांमधून १४ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती ३, अनुसूचित जमाती १ , नागरिकांचा मागास प्रवर्ग ४ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून ६ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारीपदी अपर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक!
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त जागांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्याकरिता घेण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मुकेश चव्हाण यांची नेमणूक करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ जानेवारी रोजी दिला.
जिल्हा परिषदेने सादर केली सदस्यांची यादी!
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त असलेल्या पदांवर जिल्हा परिषद सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घ्यावयाची आहे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांची यादी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनामार्फत ८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली.