लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या लाचखोर वरिष्ठ लिपिकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार पाचशे रुपयांची लाचेची रक्कम घेताना मंगळवारी दुपारी रंगेहात अटक केली. त्याच्याजवळून रोख रकमेसह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तक्रारदार व त्यांचे सहकारी हे जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत आहेत. त्यांनी जुलै २०१६ ते मार्च २०१७ दरम्यानचे घरभाडे भत्ता बिल १४ हजार रुपये व त्यांचे सहकारी यांचे १५ हजार रुपयांचे देयक सादर केले. आरोग्य विभागातील वरिष्ठ लिपिक नितीन महादेव दांडगे याने तक्रारदारास १४ हजार रुपयांचे देयक काढण्यासाठी ५०० रुपये आणि १५ हजार रुपयांचे देयक काढण्यासाठी एक हजार रुपये असे एकूण दीड हजार रुपयांची लाच मागितली; मात्र तक्रारकर्त्यास ही रक्कम देणे नसल्यामुळे त्यांनी सोमवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने आरोग्य विभागात सापळा रचून नितीन दांडगे यास दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे आरोग्य विभागातील लाचखोरी पुन्हा उघडकीस आली आहे. जिल्हा परिषदेतीलच एका कर्मचाऱ्यानेच दुसऱ्या कर्मचाऱ्यावर ही कारवाई केल्याने आरोग्य विभागात किती मोठ्या प्रमाणात लाचखोरीचे प्रमाण सुरू आहे, हे यावरून दिसून येते.सर्वोपचारमध्येही टक्केवारीसर्वोपचार रुग्णालयातही वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक काढण्यासाठी प्रचंड प्रमाणात टक्केवारी घेण्यात येत आहे. या विभागातील देशमुख नामक व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने काही वर्षांपूर्वी लाच घेताना अटक केली होती; मात्र त्यानंतर आता पुन्हा वैद्यकीय देयक काढण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात खुलेआम टक्केवारी घेण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लाच घेताना लिपिक अटकेत!
By admin | Published: May 17, 2017 2:22 AM