अकोला : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. गार वाऱ्यामुळे थंडीतही वाढ झाल्याने त्याचा फटका नवजात शिशूंच्या आरोग्याला बसत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी नवजात शिशूंची योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरत असून, गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसानेही हजेरी लावली आहे. काही भागात गारपीट झाली असून, थंड वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. विशेष: नवजात शिशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नवजात शिशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी राहते. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचा परिणामही बाल रुग्णांवर दिसू लागला असून, बालरोग तज्ज्ञांकडे येणाºया रुग्णांमध्ये एक वर्षाआतील बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. एक वर्षाआतील बालकांना कुठल्याच प्रकारचा आजार होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकाने विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.बचावासाठी हे करा...
- नवजात अर्भकांना ऊबदार, मऊ कपड्यांत ठेवा.
- हातमोजे, पायमोजे, टोपी घालून त्याचे गारव्यापासून संरक्षण करा.
- दुपट्ट्यासाठी शक्यतो सुती कापडाचा वापर करावा.
या आजारांचा धोका...सर्दी, खोकला, ताप, जुलाब होऊ शकते. विषाणूंच्या संसर्गामुळे यापैकी आजार होण्याची शक्यता असते.नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम बालकांच्या आरोग्यावर दिसून येतो. अशा वेळी बालकांना योग्य पद्धतीने जपण्याची गरज असते. शिवाय, या बालकांसाठी आईचे दूध महत्त्वाची भूमिका बजावते.- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.