अकोला : फेर तपासणी न करता शासनाने जाहिर केल्याप्रमाणे अनुदानास पात्र घोषित शाळांना २० टक्के व २० अनुदानित शाळांना ४० टक्के अनुदान टप्पा तात्काळ द्यावा अशी मागणी करीत तपासणीसाठी अकोल्यात आलेल्या शासनाच्या पथकाचा महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
राज्यातील अनुदानास पात्र घोषित व २० अनुदानित खाजगी प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यासाठी शासनाने गठित केलेले पथक बुधवार, ९ डिसेंबर रोजी अकोल्यात दाखल झाले होते. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने अकोल्यामध्ये दाखल झालेल्या तपासणी पथकाची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त केला.
तपासणीचा फार्स बंद करून शासनाने तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी संघटनेने तपासणी समितीसमोर केली. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष मनीष गावंडे, उपाध्यक्ष अल्केश खेडकर, राज्य सहसचिव नरेंद्र चिमणकर, राज्य सहसचिव अविनाश मते, राज्य सहसचिव गजानन सवडतकर, राज्यसहसचिव कैलास सुरळकर, जिल्हाध्यक्ष वसीम मुजाहिद,दत्ता घोंगे,कपिलेश आंबेकर,फारूक सर इफ्तेकार सर जुनेद सर, फईक सर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.