राजनापूर खिनखिनी : जामठी बु. विद्युत कार्यालयांतर्गत येत असलेल्या अकोली (जहा) येथील कृषी पंपांचे विद्युत रोहित्र गत सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.अकोली (जहा) येथील विद्युत रोहित्र गत सहा महिन्यांपूर्वी जळाले होते. या रोहित्रावर ३२ कृषी पंपांच्या जोडण्या आहेत. त्यापैकी १० कृषी पंपधारकांनी विद्युत देयकही भरले असून, उर्वरित शेतकर्यांचीही देयक भरण्याची तयारी आहे; परंतु विद्युत कंपनी नवीन रोहित्र बसविण्यास तयार नाही. विद्युत कंपनीच्या या हेकेखोर धोरणामुळे पाणी उपलब्ध असतानाही शेतकर्यांना उन्हाळी भुईमूग व पालेभाज्यांची पिके घेता आली नाहीत. अनेक वेळा विनंती अर्ज, निवेदन सादर करूनही स्थानिक पातळीवर त्याची दखल घेतल्या जात नसल्याचे पाहून शेतकर्यांनी अकोला येथील विद्युत कार्यालयावर धडक दिली; परंतु तेथेही आश्वासनाखेरीज त्यांना काहीही मिळाले नाही. त्यामुळे आता या गावातील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
सहा महिन्यांपासून रोहित्र बंद
By admin | Published: June 27, 2014 9:20 PM