नया अंदुरा : परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने व सोमवारी तुरळक पाऊस झाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तूर सोंगणी करून शेतात ठेवली आहे. पावसात तूर भिजण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.
ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी फवारणीच्या कामात व्यस्त आहे. महागड्या औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा सततच्या पावसामुळे खरिपातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शतेकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना सध्या तूर पिकाकडून आशा आहे; मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नया अंदुरा, कारंजा रमजानपुर, अंदुरा, हाता, बहादुरा कवठा, लोहारा, निंबी, शिंगोली, निंबा फाटा आदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी तुरीची सोंगणी करून शेतात ठेवली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. त्यामुळे सोंगणी करून ठेवलेली तूर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पाऊस येण्याची शक्यता असल्याने सोंगणी करून ठेवलेली तूर हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. (फोटो)
----------------------
मी माझ्या शेतातील तुरीची सोंगणी केली असून, अचानक ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे तूर भिजण्याची भीती आहे.
- संजय अढाऊ, शेतकरी, नया अंदुरा