अकोला : मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ व पावसाचे वातावरण असल्याने पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य व (आॅक्सिजन) हवेचा पुरवठा तसेच प्रकाशसंश्लेषणच नाही. परिणामी, पिके पिवळे पडत असून सोयाबीन, कपाशीसह इतर पिके धोक्यात आली आहेत.विदर्भात १७ लाख हेक्टरवर कपाशी व तेवढेच सोयाबीनचे क्षेत्र आहे. इतर पिके मिळून जवळपास ५१ लाख हेक्टर खरीप पिकांखाली आहे. यावर्षी सुरुवातीला पाऊस उशिरा सुरू झाल्याने पेरणीला उशीर झाला. २३ जून रोजी पहिला पाऊस पडला. या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पावसाने चार आठवडे दडी मारली. २५ जुलैपासून पुन्हा तुरळक पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आजतागायत सुरू असून, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यप्रकाशच नसल्याने पिकांना प्रकाश संश्लेषण होत नसून, पिकांची मुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुरळक स्वरू पाच्या पाऊस पडत असल्याने शेतीची मशागत करणे कठीण झाले. त्यामुळे पिकात तणाचे प्रमाण खूप वाढले आहे. हे वातावरण किडींना पोषक असून, सोयाबीन, कपाशीसह इतर पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
- या उपाययोजना कराव्या!अतिरिक्त पाऊस झाल्यास जमीन संपृक्त होऊन मुळांना प्राणवायू मिळत नाही तसेच अपुरा सूर्यप्रकाश यामुळे प्रकाशसंश्लेषण न झाल्याने पीक पिवळे पडू लागते. अशावेळी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) किंवा १९:१९:१९ हे विद्राव्य खत १ किलो १०० लीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, पिकात अतिरिक्त पाणी साचून राहिल्यास मूळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच करपा, कवडी या रोगाचा आणि उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.मूळकुजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी, कॉपर आॅक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात झाडांच्या बुंध्याशी आळवणी करावी, चर काढून शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, कॉपर आॅक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रतिलीटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, असा सल्लाही डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला.
- पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण व तुरळक पाऊस पडत असल्याने पिकांच्या मुळांना अन्नद्रव्य पुरवठा होत नसल्याने पिके पिवळी पडण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी शक्य असेल तेथे उकरी करू न युरियाचा डोस द्यावा, कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार तण किडीचे व्यवस्थापन करावे.डॉ. आर. एन. काटकर,सहयोगी संशोधन संचालक,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.