ढगाळ वातावरण आणि पहाटेच्या वेळेस पडणारे धुके यामुळे तूर आणि हरभऱ्याचे पीक धोक्यात सापडले आहे. खारपाणपट्ट्यातील तूर पिकावर अळीने थैमान घातले आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांची मोठी हानी झाली. लावलेला खर्च ही वसूल होण्याची शक्यता नाही. तुरीचे पीक चांगले येईल अशी आशा बाळगून असताना खारपाणपट्ट्यात तूर पिकावर अळीने थैमान घातले आहे.
हातरुण, मांजरी, बोरगाव वैराळे, अंदुरा, निमकर्दा, शिंगोली, दुधाळा, लोणाग्रा, मालवाडा, मंडाळा परिसरात तूर आणि हरभरा पिकाची बऱ्यापैकी पेरणी झाली आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या फुलोऱ्याची गळती होत असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पीक धोक्यात सापडले आहे. हातरुण परिसरातील शेतशिवारात तूर आणि हरभरा पिकावर कीटकनाशक फवारणी करण्याची लगबग दिसून येत आहे.
फोटो: दोन
संकटाची मालिका!
यंदा उडिदाच्या पिकावर रोगराई आली. अवकाळी पावसामुळे ज्वारीला कोंब फुटले. पावसाने सोयाबीन मातीमोल केले. कापसावर बोंडअळी आली. पिकाला मोठ्या प्रमाणात खर्च लावल्यानंतरही उत्पन्न घटले आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला असून कर्ज कसे भरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शासनाने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तुरीवर अळीने थैमान घातले आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पीक धोक्यात सापडले असून, पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
- संजय घंगाळे, शेतकरी, अंदुरा
खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर रब्बी हंगामातील हरभरा पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. यावर्षी खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घटले. तूर व हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला असून, कीटकनाशके फवारणी करण्यात येत आहे.
- महेश बोर्डे, शेतकरी, शिंगोली.
शेतशिवारात तूर, हरभरा, गहू पिकाची मंगळवारी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना उपाययोजना करण्याबाबत माहिती दिली.
- सुजित गावित, कृषी सहायक, हातरूण.