अकोला: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडीच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हाभरातील ० ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांची तपासणी करून क्लबफूटच्या रुग्णांची ओळख पटविण्यात येणार आहे. या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालय येथे क्लबफूट सेलमध्ये उपचार होणार आहे.जन्मत:च तिरळे पाय असलेल्या क्लबफूटच्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावा, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे क्लबफूट सेलची स्थापना करण्यात आली आहे. शनिवार १३ जुलै रोजी क्लबफूटच्या १७ चिमुकल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत दर शनिवारी या रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील अंगणवाड्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून क्लबफूटच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात आणले जाणार आहे.रुग्णांसाठी क्लबफूट शूजक्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट (सीआयआयटी)च्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत तिरळे पाय असणाºया रुग्णांसाठी सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र क्लबफूट सेल सुरू करण्यात आला. या माध्यमातून ज्या रुग्णांना क्लबफूट शूजची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना नि:शुल्क दिले जाणार आहेत.जिल्हाभरातील ० ते ६ वर्ष वयोगटातील क्लबफूटच्या रुग्णांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार व्हावा, या अनुषंगाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम राबविली जात आहे. अंगणवाड्यांच्या साहाय्याने असे रुग्ण शोधून त्यांच्यावर दर शनिवारी उपचार केला जाणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.