लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हानिहाय आढावा बैठका घेणार असून, त्यामध्ये १८ डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यानुषंगाने पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी बुधवार, ११ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भातील जिल्हानिहाय बैठकांमध्ये विकास कामांचा आढावा घेणार आहेत. त्यामध्ये १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री अकोला जिल्ह्यातील विकास कामांच्या मुद्यांवर आढावा बैठक घेणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अवकाळी पावसाने जिल्ह्यातील पिकांचे नुकसान व पीक नुकसान भरपाईची मदत, सिंचन प्रकल्पांची रखडलेली कामे, कृषी पंपांना वीज जोडणी, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची कामे, रस्त्यांची कामे अशा विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार असल्याच्या पृष्ठभूमीवर पूर्वतयारी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर बुधवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात येणाºया मुद्यांची माहिती जिल्हाधिकारी संबंधित विभागाच्या अधिकाºयांकडून घेणार आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री १८ डिसेंबरला घेणार अकोल्यातील विकास कामांचा आढावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:06 AM