बबन इंगळे
बार्शिटाकळी: येणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करीत, शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहेत. नवनवीन प्रयोग करून, फळबाग, वनस्पती, मसाला पिके, कडधान्य आदींसह अनेक पिकांच्या भरघोस उत्पादन घेऊन नफा मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच पद्धतीने शेती पिकवून सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा येथील शेतकरी मोहनराव देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन, दि. १ जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत.
बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या टीमने देशमुख यांना घरचे सोयाबीन बियाणे साठवून ठेवण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केल्याने, त्यांनी सोयाबीन बियाणे पेरणीयोग्य असे साठवून ठेवले. आज रोजी ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणे शेतात पेरणी केले, ते सर्व उगवल्याची माहिती शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे देशमुख यांना दिली. याची दखल घेऊन कृषी विभागामार्फत देशमुख यांची माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली. त्यानुसार, कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री या शेतकऱ्यांसोबत थेट ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
------------------------------------------------
५०० क्विंटल सोयाबीनची केली विक्री!
शेतकरी मोहनराव देशमुख यांच्याकडे शंभर एकर शेती आहे. यंदा खरीप हंगामापूर्वी विविध कंपन्यांच्या पॅकिंगच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरच्याच बियाण्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. उगवण शक्ती तपासल्यानंतर ८० टक्केच्या जवळपास बियाणे पेरणीयोग्य असल्याने त्यांनी अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५०० क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे बाजार भावापेक्षा अधिक नफा मिळवून विक्री केले. यामधून त्यांना तब्बल ३० लाख रुपयांचा नफा झाला. त्याची दखल घेऊन कृषी आयुक्तालयाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी देशमुख यांचा सत्कार केला.
---------------------------------------------
टिटवा येथील शेतकरी देशमुख यांनी घरचे सोयाबीन बियाणे विक्री केल्याने विक्रमी नफा मिळविला. त्यांच्याशी कृषी दिनी थेट मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
-कांताप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, अकोला.
--------------------------------------------
मी खरीप हंगामातील पेरणीसाठी पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनात घरचेच दर्जेदार पेरणीयोग्य सोयाबीन बियाणे घरूनच बाजारभावापेक्षा अधिक दराने विकले. यातून मला ३० लाख रुपयांचा नफा मिळाला असून, शेतकऱ्यांनाही लाभ झाला.
- मोहनराव देशमुख, शेतकरी, टिटवा.