बुलडाणा : २७ जूनपासून राज्यात नवीन शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार असून, राज्यभर प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रवेशोत्सवानिमित्त खुद्द मुख्यमंत्री राज्यातील पाच शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षणाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सोयगाव येथील शाळेची निवड करण्यात आली आहे. २0१६ - १७ या शैक्षणिक वर्षात विदर्भातील शाळा २७ जून रोजी सुरू होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळांसोबत २७ जून रोजी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत. या व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी राज्यातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमधील पाच विद्यार्थी यामध्ये तीन मुले व दोन मुली त्यांचे प्रत्येकी एक पालक, शाळेतील सर्व शिक्षक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, प्राचार्य डाएट, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहेन. जिल्हाधिकारी कार्यालयातून हा संवाद होईल. याकरिता शाळांना शाळेची वैशिष्ट्यपूर्ण माहिती सादर करणारा दोन मिनिटांचा व्हीडीओ व बॅनर तयार करावा लागणार आहे.
या पाच शाळांची झाली निवड !व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी नागपूर जिल्ह्यातील विवेकानंद नगरमधील मनपा हिंदी उच्च प्राथमिक शाळा, गडचिरोली जिल्ह्यातील जि. प. शाळा बेजूर ता. गोरेगाव, चंद्रपूर जिल्ह्यातील दाताळा येथील जिल्हा परिषद शाळा, बुलडाणा जिल्हय़ातील सोयगाव येथील जिल्हा परिषद शाळा,अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील डोमी येथील जिल्हा परिषद शाळा तसेच चिखलदरा तालुक्यातीलच मोझरी येथील शाळेचा समावेश आहे.