अकोला : अकोला जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळ व विविध विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. जिल्हा प्रशासन, महापालिका तसेच कायदा व सुव्यवस्था यांचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांची नजर २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांवरच होती. जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना, महापालिकेसाठी अमृत व घनकचरा व्यवस्थापनाची योजना असो की शेततळ्यांची पूर्तता असो, प्रत्येक योजनांचे उद्दिष्ट सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अमृत योजनेसंदर्भात व्हीडीओ कॉन्फरन्सवर राज्याच्या सचिवांशी चर्चा करतानाही ही योजना डिसेंबर २०१९ पर्यंत नाही, तर सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करा, डिसेंबरमध्ये पूर्ण कराल, तर आम्हाला काय फायदा, अशी मिश्कील टिपणीही मुख्यमंत्र्यांनी केल्यामुळे मुख्यमंत्री निवडणूक मोडवर पोहोचले असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तब्बल पाच तास विविध योजनांची स्थिती जाणून घेतली. यावेळी नगरविकास व गृह राज्यमंत्री तसेच अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जि. प. अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अकोल्यातील तब्बल ११४ गावांकरिता पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगत या सर्व योजना एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. विशेष म्हणजे, साडेचार वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा हा विक्रमच असल्याची टिपणीही त्यांनी केली. यामध्ये खारपाणपट्ट्यातील १८१ गावांसाठी ३१८ कोटींच्या योजनेचाही समावेश असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान आवास योजना, अतिक्रमित घरांना नियमित करून आवास योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असो की मागेल त्याला शेततळे ही योजना असो, प्रत्येक योजना सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण झाली पाहिजे, असे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले.
मुख्यमंत्री २०१९ च्या मिशन मोडवर; सप्टेंबरपर्यंत योजनांच्या पूर्ततेचे निर्देश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 6:09 PM