लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले; परंतु तुरीला भाव नाही. नाफेडच्या तूर खरेदीसाठी जाचक अटी लादल्या आणि दुसरीकडे भाजप सरकारने परदेशातून १३५ रुपये किलो दराप्रमाणे तूर आयात केली. हा सारा प्रकार शेतकर्यांची फसवणुक करून त्यांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त करणारा आहे. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, पुरवठा मंत्री गिरीश बापट हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर शेतकरी हत्येचे गुन्हे दाखल करून त्यांना फासावर लटकवले पाहिजे, असा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला. महाराष्ट्रातील ४0 शेतकरी संघटनांची असलेली सुकाणू समितीच्यावतीने शहिद दिन २३ मार्च रोजी हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. ही यात्रा शुक्रवारी दुपारी अकोल्यात पोहोचली. यावेळी शासकीय विश्रामगृहात सायंकाळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले असताना, परदेशातून तूर आयात करण्याची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करीत, तूर खरेदीत मोठा घोटाळा या सरकारने केला आहे. शेतकर्यांना आत्महत्या करण्यास मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचे धोरण भाग पाडत आहे. शेतकर्यांची ५0 रुपये किलो दराने तूर खरेदी करण्यास सरकार तयार नाही आणि परदेशातून १३५ रुपये किलो दराने तूर आयात केली जाते. शेतकर्यांच्या मालाला आधारभूत भाव देऊ आणि ५0 टक्के नफा देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते; परंतु शेतकर्यांना आधारभूत भाव तर मिळालाच नाही, उलट मोदींच्या सत्ताकाळात ३५ टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. त्यामुळेच शेतकर्यांना जागरूक करण्यासाठी शेतकरी संघटनेने जागर यात्रा काढली. सत्ताधारी व विरोधी पक्ष मिळून खाताहेत. सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षांनी काहीही केलेले नाही. शेतकर्यांविषयी कोणालाही कळवळा नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे चारही पक्ष उद्योगपतींच्या पैशांवर चालत असल्याचाही आरोप रघुनाथ पाटील यांनी केला. भाजप सरकारच्या विरोधात शेतकरी संघटनांच्यावतीने प्रत्येक जिल्हय़ात १0 मे रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करून जेलभरो करण्यात येईल, अशी माहिती यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला कष्टकरी शेतकरी संघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष कापुसदे, दिनकर दाभाडे, कालिदास आपेट, किशोर ढमाले उपस्थित होते.
भाजपचा मेळावा म्हणजे पैशांचा चुराडाशेतकर्यांना सरसकट कर्जमाफी व वीज बिल माफीसाठी यांच्याकडे पैसा नाही आणि भाजपच्या मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आहे, असा आरोप करीत रघुनाथ पाटील यांनी, आगामी निवडणुका भाजप केवळ पैशांच्या भरवशावरच लढणार आहे, असेही ते म्हणाले.-