लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाने दूध पुरवठा करणाऱ्या प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांची देयके मागील तीन आठवड्यांपासून दिले नसल्याने जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय कोलमडला आहे. दुग्धोत्पादनाचा जोड व्यवसाय करणारा शेतकरी यामुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. कॅशलेस पद्धतीने देयके देणार असल्याचा हट्ट संघाने धरल्याने यामागे जिल्ह्यातील कार्यरत दूध उत्पादक संस्थाच बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप संस्था चालकांकडून होत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांचा संघ मर्यादित अंतर्गत गावोगावी प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. शेकडो शेतकरी या संस्थांचे सदस्य असून, प्राथमिक दूध संस्थांना दूध पुरवठा ते करतात. या संस्था जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या संघाला दूध पुरवठा करतात. संघाकडून या संस्थांना दूध पुरवठ्याची देयके अदा केली जातात; परंतु संघाने कॅशलेस व्यवहारावर भर दिला आहे. परिणामी, जिल्ह्यातील नऊ सहकारी दूध संस्थांची देयके रखडली आहेत. जून आणि आता १० जुलैपर्यंत ही देयके मिळाली नाहीत; परंतु कर्मचाऱ्यांना मात्र रोख अग्रीम दिल्याचा आरोप दूध संस्थांच्यावतीने करण्यात आला आहे.‘कॅशलेस’चे आदेश यापूर्वी आदेश सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या प्राधिकृत अधिकारी समिती प्रमुखांच्या हवाल्याने दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्थांना नोटिसद्वारे पाठविला आहे. या आदेशानुसार संस्थेचे देयक अदा केल्यानंतर संस्थेने शेतकरी दूध उत्पादक सभासदांना कॅशलेस प्रणालीद्वारे दुधाचे देयक अदा करणे अनिवार्य केले आहे. त्यासाठी संस्थांनी कॅशलेस प्रणालीने देयके अदा केल्यास संस्थेची बँक खात्याच्या उताऱ्याची झेरॉक्स प्रत कार्यालयास सादर करणेही अनिवार्य केले आहे. त्यानंतरच संस्थांना पुढील देयके अदा करण्यात येणार असल्याने एका नोटिसद्वारे संघाने संस्थांना अवगत केले आहे.मागील तीन आठवड्यांपासून दूध विक्रीची देयके मिळाली नाहीत. कॅशलेसची कारणे सांगितली जात आहेत. या व्यवहारासाठी नेहमी बँक स्टेटमेंट काढावे लागते. संघाने एकदाचे बँकेला पत्र देऊन कळवावे. बेअरर धनादेश असेल तर देऊ नये; पण संघ अडवणूक करीत आहे.मोहन देशमुख,अध्यक्ष,श्रीराम सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्था, पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला.शासनाने देयके दिली आहेत. संघ व प्राथमिक संस्थांचा तो अंतर्गत प्रश्न आहे.आर.बी. मते,जिल्हा दुग्ध विकास व्यवसाय विकास अधिकारी,अकोला.
सहकारी दूध संस्थांना ‘कॅशलेस’चा फटका!
By admin | Published: July 12, 2017 1:48 AM