अतुल जयस्वाल, अकोला : मध्य रेल्वेने मुंबई ते हावडा दरम्यान धावणाऱ्या सीएसएमटी मुंबई-हावडा सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेसची कोच संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अकोलामार्गे आठवड्यातून एकदा जाणारी ही एक्स्प्रेस १८ ऑक्टोबरपासून सुधारीत कोच संरचनेसह धावणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.
मुंबई येथून सुटणारी १२८६९ सीएसएमटी मुंबई-हावडा सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस १८ ऑक्टोबरपासून तर हावडा येथून सुटणारी १२८७० हावडा-सीएसएमटी मुंबई सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस २० ऑक्टोबरपासून सुधारित कोच रचनासह धावणार आहे. सुधारीत रचनेनुसार या एक्स्प्रेसला आता २२ एलएचबी कोच असतील. यामध्ये एक प्रथम श्रेणी वातानुकुलीत शयनयान, दोन द्वितीय श्रेणी वातानुकुलीत शयनयान, ६ तृतीय श्रेणी वातानुकुलीत शयनयान, ३ तृतीय श्रेणी वातानुकुलीत ईकॉनॉमी शयनयान, ५ द्वितीय श्रेणी शयनयान, ३ सामान्य श्रेणी यासह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन, १ एसी पँट्री कार आणि १ जनरेटर व्हॅनचा समावेश असणार आहे. जागा आरक्षित करण्यापूर्वी रेल्वे कोच रचनेतील बदल लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.