पारस: वीज प्रकल्पातील कोळसा-मांडोली रस्त्याचे निविदा मंजूर होऊन उदघाटन झाले, परंतु रस्त्याचे काम सुरूच झाले नाही. या मार्गाने राखेची वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकची वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, काम सुरू होईपर्यंत ट्रकची वाहतूक थांबवावी, अशी मागणी करीत प्रकल्पाच्या मुख्य द्वारासमोर कोळसा व मांडोली येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले होेते. याबाबत माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेत मुख्य अभियंत्यांना भेटून चर्चा केली. त्यानंतर मुख्य अभियंत्यांनी वाहतूक थांबविली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषणाची सांगता केली.
कोळसा-मांडोली रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, तसेच या मार्गाने राखेची वाहतूक थांबवावी, या मागणीसाठी कोळसा व मांडोली येथील कैलास घोंगे, मोहन काळे, शुद्धोधन वानखडे, आकाश मुंडे, सागर वानखडे, मंगेश मलोकर यांच्यासह ग्रामस्थांनी पारस येथील प्रकल्पाच्या मुख्यद्वारानजीक बेमुदत उपोषण सुरू केले. यावेळी ‘वंचित’चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, अविनाश खंडारे, हमीद भाई, मंगेश गवई, किशोर खंडारे आदींनी मुख्य अभियंत्यांना भेटून परिस्थितीची माहिती दिली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी मुख्य अभियंत्यांनी दखल घेऊन रात्री १२ वाजतापासून मांडोली-कोळसा रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक स्थगित केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी रवी खांडेकर, आश्विन खंडारे, भूषण करंगले, युनूस सेठ, संजू सावळे, विकी खंडारे, सचिन खंडारे, नजाकत भाई, मुकेश खंडारे, नरेश चवारिया, धम्मा वानखडे, नागेश वानखडे, चेतन जमोदकर, गौरव तायडे, नितीन मोहाड, कडू खंडारे, सागर नाटेकर उपस्थित होते.