अकोला: गायीच्या गोठ्यात पिंजरा ठेवलेला. त्यात उंदीर अडकलेला. हा उंदीर पाहून, नागोबासुद्धा पिंजऱ्यात शिरले. मस्तपैकी उंदरावर ताव मारला. नागोबा बाहेर पडण्याच्या तयारी करू लागले. परंतु नागोबाला बाहेर काही पडता येईना. अखेर नागाेबाला पिंजऱ्यातच काही तास काढावे लागले. हा किस्सा आहे शहरापासून जवळ असलेल्या सोमठाणा गावातील. २४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास मेहेंगे यांच्या गायवाड्यात ठेवलेल्या उंदराच्या पिंजऱ्यात कोब्रा नाग शिरला. मेहेंगे यांना पिंजऱ्यात नाग अडकल्याचे आणि तो बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसले. त्यांनी मानद् वन्यजीवन रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. काळणे यांनी तातडीने सोमठाणा येथे धाव घेतली आणि गोठ्यातील पिंजऱ्यात अडकलेल्या नागाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु पिंजऱ्यातून नागोबाला काढताना काळणे यांना चांगलीच कसरत करावी लागली. अखेर काळणे यांनी नागाची पिंजऱ्यातून सुखरूप सुटका केली. नाग पिंजऱ्यात अडकल्यामुळे इतर गायी-वासरे बांधलेली असताना, त्यांना इजा झाली नाही. काळणे यांनी नागाला पकडून सुरक्षित जंगलात सोडून दिले. जंगल परिसरातील गावातील लोकांनी काळजी घ्यावी. साप दिसल्यास तातडीने सर्पमित्रांना कळवावे, असे आवाहन बाळ काळणे यांनी केले.
फोटो:
कुत्र्यांच्या भुंकण्याने घरात साप शिरल्याचे कळले!
सकाळी ४ वाजता सुमारास नाग घराच्या परिसरात शिरला. साप फुत्कारत होता. कुत्र्याने भुंकून कुटुंबाला सावध केले. वृंदावन नगरातील कुळकर्णी यांना नागाला पाहिल्यावर त्यांची भंबेरीच उडाली. त्यांनी पहाटे ५ वाजता मानद् वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना माहिती दिली. काळणे यांनी तेथे पोहोचून नागाला बाटलीबंद केले.
कुत्रे व मांजर हे पाळीव प्राणी कोणताही साप दिसल्यास मानवास सावध करतात, अशी माहितीही काळणे यांनी दिली.