अकोला: जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना दिले. यासोबतच जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाला दिले.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत १० मार्च रोजी घोषित करण्यात आला. त्यानुसार अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार असून, निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्यासाठी अधिनियम १९८५ नुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज लावण्यास परवानगी नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रातील भिंती, लोखंडी खांबांवर लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज २४ तासांत स्वखर्चाने काढण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्या, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नोडल अधिकारी नरेंद्र लोणकर यांनी जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना दिले. यासोबतच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती व सहकारी संस्था इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांची शासकीय वाहने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांना दिले.पोस्टर्स, बॅनर्स न काढल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा!सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी लावण्यात आलेले पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्ज २४ तासांच्या मुदतीत न काढल्यास १२ मार्चनंतर यंत्रणेमार्फत पोस्टर्स, बॅनर व होर्डिंग काढण्याची कारवाई करून संबंधितांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही अपर जिल्हाधिकाºयांनी विभाग प्रमुखांना दिले.कायदा व सुव्यस्थेचा अहवाल सादर करा!लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा दैनंदिन अहवाल विहित नमुन्यात जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता नोडल अधिकाºयांनी रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना दिले.राजकीय पक्ष पदाधिकारी वअधिकाºयांची आज बैठक!लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि लागू करण्यात आलेली आचारसंहिता यासंदर्भात माहिती देण्यासाठी सोमवार, ११ मार्च रोजी दुपारी १ वाजता जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकाºयांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात येणार आहे. आचारसंहितासंदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचना आणि निर्देशांची माहिती या बैठकीत दिली जाणार आहे. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकाºयांच्या दालनात जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांची बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेसह आचारसंहितेची माहिती देण्यात येणार आहे.
आचारसंहिता लागताचपालकमंत्र्यांची गाडी जमा!लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे शासकीय वाहन (कार) जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले. शासकीय वाहने जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये सर्वप्रथम पालकमंत्र्यांकडून शासकीय वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले.