अकोला : मागील चार-पाच दिवसांपासून रात्रीच्या तापमानात घट होत आहे. जिल्ह्यात सोमवारी थंडी वाढून हुडहुडी भरली होती. तर दुसऱ्या दिवशीही थंडीचा जोर कायम होता. मंगळवारी अकोल्यात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात सातत्याने घसरण होत असून, कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे.
वातावरणाच्या लहरीपणामुळे थंडीचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. गेल्या वर्षी किमान तापमान ११ अंशांपर्यंत खाली घसरले होते. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, दिवसभर अंगात थंडी राहत असल्याने नागरिकांकडून स्वेटर व मफलरचा वापर वाढला आहे. हे वातावरण शेतीला व रब्बीतील हरभरा, गहू पिकासाठी लाभदायक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. थंडीचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झाला आहे. मागील आठवड्यात दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण असे चित्र होते. ढगाळ वातावरणामुळे गारवा कमी झाला होता. त्यामुळे उष्णता वाढली होती. आता दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला होता. येत्या काही दिवसांत थंडीचा चांगलाच कडाका जाणवणार आहे.
‘मॉर्निंग वॉक’साठी गर्दी
वाढत्या थंडीचा फायदा घेत सकाळी-सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या व व्यायाम करणाऱ्या नागरिकांची रीघ वाढली आहे. पोलीस भरती, सैन्य भरतीची तयारी करताना मुले बघायला मिळत आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी वाढली आहे.