गुलाबी थंडीने ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. थंडी जाणवू लागली असून, दोन दिवसांपूर्वी हातरुण परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडले होते. परिसरात गारठा कायम आहे. थंड हवा वाहत असल्याने थंडी जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात कडाक्याच्या थंडीमुळे जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवुन थंडीपासून बचाव केला जात आहे. उबदार कपड्यांच्या दुकानावर गर्दी दिसून येत आहे.
सायंकाळनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. लोक सायंकाळी बाहेर पडणे टाळत आहेत. लहान बालक व वृद्ध नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाही कमालीची थंडी जाणवत आहे. बदलत्या वातावरणामुळे रुग्णांची उपचारासाठी दवाखान्यात गर्दी दिसून येत आहे.
राजकीय वातावरण तापले!
ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे पेटलेल्या शेकोट्यांवर राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत. या निवडणुकीसाठी युवावर्ग सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून, मोर्चेबांधणी सुरू आहे. संभाव्य उमेदवार कागदपत्रांची जुळवाजुळव करत असल्याचे दिसून येत आहे.