फोटो:
गावात अस्वच्छता; ग्रामपंचायतचे दुर्लक्ष
हिवरखेड : गावात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. नाल्या, गटारे सांडपाण्याने तुंबली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील स्वच्छतेकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावात नियमित स्वच्छता करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोराेनाचा प्रादुर्भाव; ग्रामस्थ गंभीर नाहीत
आलेगाव : आलेगावात सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नसतानाही, ग्रामस्थ गंभीर दिसत नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहेत. ग्रामपंचायतसुद्धा याबाबत उदासीन आहे.
ग्रामीण शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ
अडगाव बु.: तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आली; परंतु विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालक फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची नगण्य उपस्थिती दिसून येत आहे. शिक्षकही हजेरी लावून निघून जात आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त
कुरूम : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात घडत आहे. काही दिवसांपूर्वी खड्डे चुकविण्याचा प्रयत्नात दोन कारचा अपघात झाला होता. यात काही लोक जखमी झाले होते. खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
बिबट्याचा वावर; शेतकरी भयभित
खानापूर : खानापूर गावाला लागून वनक्षेत्र आहे. घनदाट जंगल असल्यामुळे जंगलामध्ये अनेक वन्यप्राणी आहेत. जंगल व शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांना नेहमीच बिबट्याचे दर्शन होते. त्यामुळे येथील शेतकरी भयभित झाले आहेत. बिबट्याने गुरांवर हल्ला करून शिकार केल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गजानन महाराज पादुका संस्थानमध्ये भाविकांची गर्दी
मुंडगाव : येथील प्रसिद्ध गजानन महाराज पादुका संस्थान मंदिर शासनाच्या परवानगीनंतर उघडण्यात आले. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांसह बाहेरगावचे भाविक गर्दी करीत आहेत. संस्थानकडून शासन नियमांचे पालन करून दररोज मोजक्याच भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. भाविकांमुळे मंदिर परिसर पुन्हा फुलला आहे.
हरभरा पिकावर कीटकनाशके फवारणीस प्रारंभ
पिंजर : यंदा नापिकीचे वर्ष गेल्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त तूर आणि हरभरा पिकावर आहे. हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतकरी कीटकनाशके फवारणीसह सिंचनावर भर देत असल्याचे दिसून येत आहे. काही भागात हरभरा पिकावर पाने खाणारी अळी आल्याचे दिसून येत आहे.
शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
पारस : परिसरातील शेतरस्त्याची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शेतरस्त्यावर चिखल, खड्डे, दगडधोंडे असल्यामुळे शेतातून माल घरी आणताना, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील शेतरस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कालव्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी
बोरगाव मंजू : परिसरात शेती सिंचनासाठी कालवे आहेत. परंतु कालव्यांमध्ये काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येत नसल्याने, पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या रब्बी पिकांचे सिंचन करण्यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रानडुक्कर, हरिणांचा पिकांमध्ये धुडघूस
माना : परिसरातील शेतामध्ये रानडुकरे, हरीण, माकडांचे कळप धुडगूस घालत आहेत. यंदा नापिकीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्यात वन्यप्राणी शेतात शिरून हरभरा, तूर पिकाचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.