अकोला: जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली असून, मागील चोवीस तासांत मंगळवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजतापर्यंत अकोला येथील किमान तापमान ६.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. दरम्यान, बुधवार, ३० जानेवारी रोजी थंडीची लाट येण्याची तर काही ठिकाणी दिवसा गारवा जाणवण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे जिल्हा गारठला आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या नोंदीनुसार गत चालू आठवड्यात २२ जानेवारी रोजी किमान तापमान १७.० अंश नोंदविण्यात आले होते. २३ जानेवारीला १४.५, २४ रोजी १२.८ डिग्री सेल्सिअस ताममान होते. २५ जानेवारी रोजी पुन्हा किमान तापमानात वाढ होऊन ते १६ अंशांनी वाढले होते. २६ जानेवारी रोजी हेच तापमान पुन्हा १४.१ अंश खाली आले. २७ जानेवारी रोजी पुन्हा १३.८ पर्यंत घटले तर २८ जानेवारी रोजी हेच किमान तापमान ९.७ अंशांनी घटले.थंडीत वाढ झाल्याने पुन्हा नागरिकांनी वूलनची कापड बाहेर काढली असून, टोप्या, मफलरी बाहेर निघाल्या आहेत. दिवसा वातावरणात गारवा असल्याने नागरिकांनी स्वेटर बाहेर काढले. अनेक ठिकाणी नागरिक, शेतकºयांनी शेकोट्यांचा आधार घेतला. थंडीत अशी वाढ होत राहिल्यास हरभरा पिकांवर घाटेअळीचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता आहे, तसेच फळ बागा, आंबा मोहरावरदेखील प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. मोहन खाकरे यांनी वर्तविली आहे. उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला मात्र ही थंडी पोषक ठरण्याची शक्यता आहे.