अकोला : जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. तीन दिवसात किमान तापमान १२.५ अंशाने खाली आले असून, ते ८.६ अंशापर्यंत आले आहे. हा पारा वेगाने खाली उतरल्याने थंडीचा कडाका वाढल्याने सर्वत्र हुडहुडी भरली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाने रविवार, २९ डिसेंबर रोजी ६.६ तर विदर्भात सर्वात कमी तापमान चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस नोंदवले आहे.विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय तर उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे. हवामानातील बदलाने अकोल्याचे जनजीवन प्रभावित झाले आहे. शनिवार सकाळपासूनच थंडीचा वाढलेला जोर रविवारी कायम होता. विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील पारा ५ अंशाखाली गेल्याने थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असते. यावर्षी मात्र डिसेंबर महिन्यातील तीन आठवड्यात हिवाळा ऋतूतील अपेक्षित थंडी पडली नाही; परंतु हवामानात अचानक बदल होऊन गुरुवारी जिल्ह्यात अनेक भागात पाऊसही पडला. तेव्हापासून थंडीत वाढ होत २८ डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढला.हिवाळ््यात जेव्हा किमान तापमान सरासरीपेक्षा ५ ते ७ अंश सेल्सिअसखाली जाते तेव्हा त्याला थंडीची लाट मानले जाते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने २६ डिसेंबर रोजी २०.५ , २७ रोजी १५.२ किमान तापमानाची नोंद केली होती. २८ डिसेंबर रोजी किमान तापमानात प्रचंड घट झाली असून, ६.५ नोंद करण्यात आली आहे.
काय आहे थंडीची लाट?४किमान तापमान ज्यावेळी पाच अंश किंवा त्याहून कमी होते, तेव्हा त्याला थंडीची लाट म्हणतात. पारा सरासरीहून सात किंवा अधिक अंशांनी घसरला तर त्याला अतिथंडीची लाट मानण्यात येते. सद्यस्थितीत अकोला परिसरातील किमान तापमान (डॉ. पंदेकृवि) ६.६ अंशावर आले आहे. शहरातील किमान तापमान ८.६ आहे.