अकोला: जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून सेरॉलॉजिकल सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. त्याअंतर्गत आतापर्यंत एकूम २८०० जणांच्या रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले असून, लॅबमध्ये नमुन्यांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. रक्ताच्या नमुने तपासणीचा अहवाल आठवडाभरात येणार असल्याचा अंदाज वैद्यकीय सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा निष्कर्ष काढण्यात येणार आहे.जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या लोकांच्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांना कोविडचा संसर्ग पोहोचला?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव प्रतिकार शक्ती तयार झाली?, त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली किंवा नाही? यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी जिल्ह्यात सेरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात आले. त्या अनुषंगाने चार पथकांचे गठन करण्यात आले होते. या पथकांच्या माध्यमातून अकोला महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले. उपक्रमांतर्गत २८०० जणांच्या रक्ताचे नमुने संकलीत करण्यात आले आहेत. संकलीत रक्त नमुन्यांच्या तपासणीस सुरुवात झाली असून, आठवडाभरात त्याचे निष्कर्ष येणार असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली आहे.
सेरॉलॉजिकल सर्वेसाठी २८०० नमुन्यांचे संकलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 6:04 PM