अकोट : भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण अकोट तालुक्यात पसरल्याने अज्ञात इसमांनी २ जानेवारी रोजी तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये एक एसटी वाहक जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हिवरखेड मार्गावर सिरसोली येथून अकोटकडे एमएच ४0 - ८६३४ क्रमांकाची एसटी बस येत असताना अज्ञात दोन इसमांनी बसवर दगडफेक केली. त्यामध्ये एसटी वाहक प्रभाकर येवले यांच्या डोक्याला दगड लागल्याने ते जखमी झाले, तर एसटीच्या काचा फुटल्या. दुसर्या घटनेत अकोट-अकोला मार्गावरील तांदूळवाडी फाट्यावर अज्ञात इसमांनी एमएच ४0 एन ९१२४ क्रमांकाच्या एसटी बसवर दगडफेक करून एसटीच्या समोरील काचा फोडल्या. त्यामध्ये दहा हजारांचे नुकसान झाले. या घटनेत अकोट ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३३६, ३३७, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, तर अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील सती मैदानाजवळ अज्ञात तीन इसमांनी तोंडाला रुमाल बांधून एमएच ४0 एन ८९६१ क्रमांकाची एसटी बस परतवाडा येथे प्रवासी घेऊन जात असताना वाहनासमोर येऊन दगडफेक केली. त्यामध्ये एसटीचे नुकसान झाले. याप्रकरणी अकोट शहर पोलिसांत भादंवि ३३६, ४२७, ३४२ कलमान्वये तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यान्वये अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनुचित प्रकार घडू नये, याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सी.टी. इंगळे, शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर व पोलीस, महसूल यंत्रणा लक्ष ठेवून असून, संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदनअकोट - शौर्य दिनानिमित्य कोरेगाव भिमा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ तहसिलदार यांना २ जानेवारी रोजी अकोट तालुका भारिप बमसंच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये समाजकंटकांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन तालुका अध्यक्ष संदिप आग्रे, तालुका सचिव डॉ.संतोष गायगोले, जिल्हा उपाध्यक्ष संजय पुंडकर, शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे, निजामोद्दीन नाजीमोद्दीन, जम्मूभाई, रवि ओहेकर, पंजाबराव पाचपाटील, सदानंद तेलगोटे यांच्यासह भारिप बमसं व अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिले.
आज अकोट शहर बंद कोरेगाव भिमा येथील घटनेच्या निषेधार्थ आकोट तालुका भारिप बमसं महासंघ शहर व अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने ३ जानेवारी रोजी अकोट बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत आकोट शहर पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली असून आकोट बंद मध्ये सर्व व्यापारी बंधूनी सहभाग द्यावा असे आवाहन तालुका अध्यक्ष संदिप आग्रे, तालुका महासचिव डॉ.संतोष गायगोले यांनी केले आहे.