अकोला : जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला असून, त्यामध्ये शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रावर लस टोचून घेतली. त्यांच्यासमवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनीही कोविड लसीकरण करून घेतले.
या वेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरती कुलवाल उपस्थित होत्या. अकोला शहरात जिल्हा स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तसेच मनपाच्या भारतीया हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. तसेच जिल्ह्यात सहा खाजगी केंद्रांवर २५० रुपये प्रमाणे सशुल्क लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी करून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.