पर्यावरण जतन-संवर्धनाची प्रतिज्ञा
अकोला : पर्यावरण जतन संवर्धनाबाबत जनजागृती व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांनी पर्यावरण जतन संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही प्रतिज्ञा सर्व उपस्थितांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित हाेते.
जिल्हाधिकारी कार्यालयात ई-टपाल प्रणालीचा प्रारंभ
अकोला : नववर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ई-टपाल प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते रिमोट्द्वारे क्लिक करून ही प्रणाली सुरू करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, नपा प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी या प्रणालीबाबत जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संदीप चिंचोले यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, या प्रणालीद्वारे जमा होणाऱ्या टपालाची पोहोच पावतीही अर्जदारास व पत्र देणारास मिळणार आहे. या पत्राला संबंधित विभागप्रमुख हे संबंधित कार्यासनापर्यंत पोहोचवून त्याचे ऑनलाइन ट्रॅकिंगही करू शकणार आहेत. लवकरच प्रत्येक विभागनिहाय या प्रणालीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन ही प्रणाली सर्व कार्यालयांत लागू केली जाईल,असे त्यांनी सांगितले.