अकोला - सोबत कॉलेजात शिकणाऱ्या मैत्रिणीची प्रकृती बिघडल्याने, ती मावस मामासोबत घरी गेली. परंतु तिच्या मैत्रिणीने खातरजमा न करताच, वर्ग मैत्रिणीने तिची बदमानी केली. याबाबत पीडित मुलीने जाब विचारला असता, तिला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप हिवरखेड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यानंतरही तिची बदनामी सुरू असल्याने, अखेर मुलीने घरात गळफास घेत, जीवनयात्राच समाप्त केली. याप्रकरणात हिवरखेड पोलिसांनी वर्गमैत्रिणीसह तिच्या दोन आजींविरूद्ध गुन्हा दाखल केला.
हिवरखेड पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या सोनवाडी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी सौंदळा येथील महाविद्यालयात शिकत होती. मुलगी दोन मैत्रिणींसोबतच पायी कॉलेजात जायची. २८ जुलै रोजी त्यांची मुलगी मैत्रिणींसह कॉलेजला गेली होती. परंतु तिची प्रकृती बिघडल्याने, कॉलेजातील शिक्षकांनी घरी फोन करून माहिती दिली. त्यामुळे तिचा मावसा मामा तिला घ्यायला कॉलेजात गेला. त्याच्या दुचाकीवर बसवून मुलगी घरी आली. परंतु तिच्यासोबत कॉलेजात शिकणाऱ्या व गावातील मैत्रिणीने तिची कॉलेजात बदनामी केली. एवढेच नाहीतर ही बाब आजी दुर्गा बापुराव सपकाळ व आजीची बहिण विमल मधुकर परघरमोर यांनाही सांगितली. त्यांनीही शहानिशा न करता, मुलीची गावात बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. याबाबत त्यांना जाब विचारला असता, त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
२९ जुलै आरोपी मुलगी व तिच्या आजी दुर्गाबाई व आजीची बहिण विमलबाई यांनी पीडित मुलीच्या घरी येऊन तिला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने तिची समजूत काढली आणि १ ऑगस्ट रोजी शेतावर निघुन केली. त्यानंतर सायंकाळी घरी परत आल्यावर पीडित मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिची मैत्रिण व मैत्रिणीच्या आजी दुर्गा बापुराव सपकाळ व आजीची बहिण विमल मधुकर परघरमोर यांनीच पीडित मुलीची बदनामी केल्याने, तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.
आठ दिवसांनंतर गुन्हा दाखल
प्रकरणाची गुंतागुंत लक्षात घेता, हिवरखेड पोलिसांनी पीडित मुलीच्या आईवडिलांसह मावस मामा, काका आणि शिक्षकांचा जबाब नोंदविल्यानंतर या आत्महत्या प्रकरणाचा तपास केला असता, गावातील अल्पवयीन मुलगी व तिच्या आजी दुर्गा बापुराव सपकाळ, विमल मधुकर परघरमोर यांनी पीडित मुलीची बदनामी केल्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणात अल्पवयीन मुलीसह तिच्या दोन्ही आजींविरूद्ध भादंवि कलम ३०५, ३२३, ५०४(३४) नुसार गुन्हा दाखल केला.