अकोला: जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि नावाजलेल्या तब्बल ७ हजारांवर विद्यार्थी संख्या असलेल्या शिवाजी महाविद्यालयातील पाच ते सहा विद्यार्थिनींचा शाब्दिक वाद वाढल्याने महाविद्यालयाच्या गेटसमोरच या विद्यार्थिनींमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. महाविद्यालयासमोरील रोडवर विद्यार्थिनींचा हा वाद सुरू असल्याने या रोडवरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. त्यामुळे पोलिसांचे एक वाहन तातडीने दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत केली.श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जिल्ह्यातील तसेच नजीकच्या जिल्ह्यातील सुमारे ७ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; मात्र महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांना वेठीस पकडल्याची माहिती आहे. याच विद्यार्थ्यांच्या कारणावरून विद्यार्थिनींमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहेत; मात्र गत दोन दिवसांपूर्वी हे वाद विकोपाला गेल्याने पाच ते सहा विद्यार्थिर्नींमध्ये गेटच्या समोर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या विद्यार्थिनींमध्ये भररस्त्यावर हाणामारी झाली. एका विद्यार्थिनीने दगडही फेकून मारला. रस्त्यावरच वाद सुरू असल्याने या रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या मुलींचा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या दोन दिशेने पळून गेल्या.प्राचार्यांनी बोलाविले पालकांना!महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींमध्ये त्यांच्या रहिवासी परिसरातील वाद आहे. याच वादातून त्या दोघी महाविद्यालयाच्या गेटपासून ते देशमुख फैलच्या गल्लीत वाद करीत गेल्या. सदर विद्यार्थिनींचा वाद हा महाविद्यालयाबाहेरील आहे; मात्र त्या दोघीही महाविद्यालयाच्या ड्रेसवर वाद करीत असल्याने त्यांच्या पालकांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. या मुलींचा वाद नेमका काय आहे, हे अद्याप समोर आले नाही; मात्र त्यांच्यात कौटुंबिक वाद असल्याची माहिती असून, त्यांच्या वागण्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.रामेश्वर भिसे,प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, अकोला.महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांचा वावरशिवाजी महाविद्यालयात शिक्षण घेत नसतानाही एका विद्यार्थ्याने महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे प्रमाणपत्र घेऊन वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशीही सुरू करण्यात आली होती. कुणाचेही नुकसान नको म्हणून ही चौकशी थांबली; मात्र बाहेरील विद्यार्थी महाविद्यालयात येऊन प्रमाणपत्र घेत असल्याने येथील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.