अकोला: दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांची कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली असून, महाविद्यालयांमध्ये गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाचा अर्ज, माहितीपत्रक मोफत पुरविण्याचा निर्णय शासनाने २00३ मध्येच घेतला होता. परंतु शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवून शहरातील कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करीत आहेत आणि प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांकडून १५0 ते २00 उकळत असल्याची वस्तुस्थिती अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिसून येत आहे. १५ जून रोजी गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातात पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये गर्दी करणे सुरू केले. १६ जूनपासून शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेता, शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची व पालकांची अक्षरश: लूट केली जात आहे. २७ मे २00३ नुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अर्ज व शाळेची, कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती पुस्तिका मोफत देण्यात यावी, असा शासनाचा स्पष्ट आदेश आहे. असे असतानाही शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिकेचे प्रत्येकी १00 ते २00 रुपये उकळत आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या लुबाडणूकीकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्या कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षण संस्थाविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
महाविद्यालयांकडून प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांची लूट!
By admin | Published: June 20, 2016 1:53 AM