अकोला: राज्य शासनाने १२ व २४ वर्षांची आश्वासित प्रगती योजना रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस डॉ. आर.बी. सिंह यांच्या आवाहनानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील शैक्षणिक कामकाज प्रभावित झाले होते.जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होऊन शासनाचा निषेध केला. लरातो वाणिज्य महाविद्यालयासमोर झालेल्या आंदोलनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. संपाला रालतो विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, लरातो वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आकाश हिवराळे, अनुप खांडेकर, काँग्रेसचे अनंत बगाडे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. संपामध्ये महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम इंगोले, महासंघाचे कार्याध्यक्ष राजा बढे, सरचिटणीस कमल गिरी, उपाध्यक्ष राजेश दंडनाईक, भालचंद्र फोकमारे, किरण पोटदुखे, वंदना मेंढे, पुरुषोत्तम ताले, एन.बी. इंगळे, विलीन धोत्रे, दत्तात्रय शास्त्री, योगेश सरप, किरण शर्मा, वि. बा. देशमुख आदींसह शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)