अकोला : ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयांचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे; परंतु अमरावती विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असून, नियोजित कामांबाबत उदासीनता दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.राज्य शासनाने सत्र २०१९ साठी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवले आहे. सामाजिक जाणिवेतून महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, यानुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सर्वच संलग्नित महाविद्यालयांना वृक्ष लागवडीचे ध्येय ठरवून दिले आहे. त्यानुसार, विद्यापीठाने सर्वच महाविद्यालयांना नियोजन आखून दिले. या नियोजनानुसार विद्यापीठाशी संलग्नित प्रत्येक महाविद्यालयाने १५ एप्रिलपर्यंत वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे गरजेचे होते; परंतु विद्यापीठाने यासंदर्भात आढावा घेतला असता, महाविद्यालयाची उदासीनता दिसून आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता विद्यापीठाने नाराजी व्यक्त करीत सर्वच संलग्नित महाविद्यालयांना वृक्ष लागवडीला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.वृक्ष लागवडीसाठी खड्डेच खोदले नाही!विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियोजनाला महाविद्यालयांनी बगल दिली आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये वृक्ष लागवडीसाठी अद्याप खड्डे खोदले नाहीत. वृक्ष लागवडीची ही मोहीम येत्या काही दिवसांतच राबविली जाणार असून, महाविद्यालयांची कुठलीच तयारी झालेली नसल्याचे वास्तव आहे.महाविद्यालयांना द्यावा लागेल कामांचा अहवाल!वृक्ष लागवडीसाठी दिलेले उद्दिष्ट, नियोजन, खोदलेल्या खड्ड्यांची संख्या, उपलब्ध रोपांची संख्या आदी माहिती महाविद्यालयांनी २५ मेपर्यंत विद्यापीठाला पाठवायची आहे. यासंदर्भात विद्यापीठाने सर्वच संलग्नित महाविद्यालयांना पत्राद्वारे सूचना दिली आहे.प्रत्येक महाविद्यालयाला वृक्ष लागवडीचे लक्ष दिले आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते. यासंदर्भात महाविद्यालयाला विद्यापीठाने सूचना केलेले पत्रदेखील मिळाले आहे.- डॉ. आर. डी. सिकची,प्राचार्य, सीताबाई कला महाविद्यालय, अकोला.