अकोला : 'अकोल्याची जत्रा' परिवारातर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून "एक शाम आप के नाम" हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम स्थानिक आदर्श पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
साहेबराव मोरडे यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोरडे, राजदीप वानखडे, राजेश घुगे, प्रगती खंदारे यांनी अतिशय बहारदार गीते सादर केली, तर या चारही गायकांना रवी डोंगरदिवे (की बोर्ड), विपुल गवई (ढोलक-तबला) व यश कदम (ऑक्ट्रोपॅड) यांनी तितक्याच ताकदीचे संगीत दिले. यावेळी प्रसिद्ध व्यंगचित्रकार गजाननजी घोंगडे, प्रा. भाग्यश्री झटाले, अनिता कवडे यांनीदेखील गीत सादर केले. प्रसिद्ध टीव्ही कलाकार किशोर बळी यांनी आपल्या विनोदी शैलीने जत्रेत हास्याची लाट फुलवली.
यांचा झाला सत्कार
'सालस' नावाचा मराठी चित्रपट बनविणारे आणि जि. प. शिक्षक असणारे संघदास वानखडे, नुकताच अकोला जिल्ह्याचा आदर्श कृतिशील शिक्षक पुरस्कार मिळालेले तुलसीदास खिरोडकर, शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी 'शेतकरी वाडा पर्यटन केंद्र' सुरू करणारे बहादुरयाचे विठ्ठलराव माळी, वृक्षारोपणासाठी हजारो रोपटी तयार करणाऱ्या सेवाधारी ग्रुपच्या आशा पिसे, अंतकला वानखडे, वंदना चव्हाण, ज्योती जंजाळ, वैशाली हातेकर, शालिनी मोरडे, जयंतराव घाटोळ, प्रशांत कलोरे, जिल्हा सरचिटणीस शिक्षक समिती अकोलाचे राजेश देशमुख, शिक्षक नेते गोपाल सुरे, प्रशांत आकोत यांचा सत्कार करण्यात आला.